26_06_28

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

 पाली या गावचे सुपुत्र डॉ. सचिन सूर्यभान वीर यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित FRCS (Urology) परीक्षा मे २०२६ मध्ये उत्तीर्ण केली

बीड हलचल, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पाली या गावचे सुपुत्र डॉ. सचिन सूर्यभान वीर यांनी इंग्लंड (UK) येथील मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी FRCS (Urology) ही परीक्षा मे २०२६ मध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाली गाव, बीड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ. सचिन सूर्यभान वीर हे सूर्यभान वीर व निवृत्त मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांचे सुपुत्र आहेत. कुटुंबातील शैक्षणिक परंपरा, संस्कार आणि अभ्यासू वातावरणामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा निर्माण झाली. याच बळावर त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. वीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल, चौसाळा येथे दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी बारावीचे शिक्षण राजर्षी शाहू कॉलेज, लातूर येथे पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी के. एम. हॉस्पिटल, मुंबई येथून MBBS पूर्ण केले. पुढे सर सयाजीराव गायकवाड हॉस्पिटल, बडोदा (गुजरात) येथून MS (General Surgery) ही पदव्युत्तर पदवी संपादन करून शस्त्रक्रिया क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले. उच्च शिक्षणानंतर डॉ. वीर यांनी मुंबईतील के. एम. हॉस्पिटल, मुंबई तसेच ग्लोबल हॉस्पिटल , मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत युरोलॉजी क्षेत्रात 2020 पर्यंत प्रॅक्टिस केली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये युरोलॉजी या विशेष शाखेत कार्य करत आपले ज्ञान, अनुभव आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत केले. दरम्यान, त्यांनी इंग्लंडमधील FRCS (Urology) ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा दिली. ही परीक्षा दोन टप्प्यांत आयोजित केली जाते आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी सखोल वैद्यकीय ज्ञान, शस्त्रक्रिया कौशल्य, क्लिनिकल निर्णयक्षमता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनत आवश्यक असते. अशा कठीण परीक्षेत मे २०२६ मध्ये यश मिळवून डॉ. सचिन वीर यांनी आपल्या परिश्रम, जिद्द आणि समर्पणाचा ठसा उमटवला आहे. डॉ. वीर यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी किंवा पाली गावासाठीच नव्हे, तर बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास जागतिक स्तरावरही यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण डॉ. सचिन वीर यांनी घालून दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय आणि शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




26_06_11

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

 प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण

शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासनाने अनोखी पद्धत अवलंबत फुले देऊन संबंधितांना जागा मोकळी करण्याचे आवाहन केले. या सकारात्मक आणि सुसंवादी उपक्रमाला व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत स्वखुशीने अतिक्रमण काढून घेतले.
या कारवाईमुळे बस स्टँड परिसरात मोकळीक निर्माण झाली असून प्रवाशांना ये-जा करण्यास मोठी सोय झाली आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे. पुढील काळातही अशा पद्धतीने अतिक्रमणमुक्त मोहिम राबवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


26_06_06

तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – कामरान खान यांची ठाम मागणी

 परळीतील निर्घृण हत्येने संताप; पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी कायदेशीर मदतीचे आश्वासन

परळी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दि. २ जून रोजी तोहीद खान यांची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख कामरान खान यांनी व्यक्त केली.
घटनेनंतर कामरान खान यांनी परळी येथे भेट देत स्वर्गीय तोहीद खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मृताच्या बंधू फिरोज खान यांच्याशी संवाद साधून कुटुंबाला धीर दिला. तसेच या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी कायदेशीर मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना कामरान खान म्हणाले की, “तोहीद खान यांची ज्या पद्धतीने अमानुष व क्रूर हत्या करण्यात आली, तो अत्यंत जघन्य गुन्हा आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यासच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल.”
स्वर्गीय तोहीद खान यांच्या लहान मुलांची अवस्था आणि कुटुंबावर कोसळलेले दुःख पाहून मन हेलावून गेल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
या प्रसंगी बीड जिल्हा कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शेख सोहेल, काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आहेतेशाम, उस्मानिया फाऊंडेशनचे शेख असेफ (माजलगाव) तसेच परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


26_06_01

गणेशमाळ परिसरात तरुणाचा संशयास्पद मृतदेह; अपघात की घातपात?

 वादळी पावसात दुचाकी घसरल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिसांकडून तपास सुरू

बीड, दि. १ (प्रतिनिधी):
तालुक्यातील लिंबागणेश–अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात सोमवारी सकाळी एका तरुणाचा रस्त्याच्या कडेला संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी अपघात की घातपात, याबाबत पोलिस तपास सुरू असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान व्यायामासाठी जाणाऱ्या काही महिलांना रस्त्याच्या कडेला एक दुचाकीस्वार पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी एमएच १६ एआर २६६१ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. मृत व्यक्ती किरण बंडू सोनावणे (रा. अंजनवती) असल्याची ओळख पटली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात वादळी पाऊस व जोरदार वारे होते. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघातानंतर दुचाकीखाली दबल्या गेल्याने संबंधिताला वेळेत मदत मिळाली नसावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला, त्यामुळे काहींनी संशयही व्यक्त केला असून हा प्रकार केवळ अपघात आहे की घातपात, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.



इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...