Monday, May 25, 2026

बीड पोलीस दलात मोठी खांदेपालट; शितलकुमार बल्लाळ शिवाजीनगर ठाणे प्रमुख

 बीड पोलीस बदल्यांचा धडाका! शितलकुमार बल्लाळ शिवाजीनगर ठाण्याचे प्रभारी | अचानक बदलामुळे चर्चा

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर आज ठाणे प्रमुखांच्या स्तरावर मोठी खांदेपालट करण्यात आली. या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या बदलीचा विषय विशेष चर्चेत राहिला. सकाळी जारी झालेल्या आदेशानुसार त्यांची बदली केज येथे झाल्याची माहिती समोर आली होती. तर केज येथील पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांची बदली बीडमधील शिवाजीनगर येथे करण्यात आली होती.
मात्र दुपारपर्यंत या निर्णयात अचानक बदल करण्यात आला आणि शितलकुमार बल्लाळ यांचीच बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली. या अनपेक्षित बदलामुळे पोलीस विभागात तसेच नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षक बल्लाळ हे शिस्तप्रिय, कडक आणि कामात काटेकोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलाच धसका निर्माण झाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील या बदल्यांमुळे प्रशासनातील हालचालींना वेग आला असून, पुढील काळात या बदलांचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Sunday, May 17, 2026

जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होणार

 

यंदा केरळ येथे मोसमी पावसाचे आगमन लवकर होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून शनिवारी मोसमी पाऊस आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान समुद्राच्या काही भागात आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह विजयपूरम येथे दाखल झाला आहे.


यंदा मोसमी पाऊस अंदमान येथे वेळेपूर्वीच दाखल झाला असून पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाची अधिक वाटचाल होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, केरळ येथे २६ मे च्या आसपास मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

तसेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यताही खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मोसमी पावसाची सध्याची वाटचाल पाहता हवामानाची स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून विदर्भात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थिती कायम असून यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानातही वाढ नोंदली जात असून काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, विदर्भात शनिवारी तापमानाचा पारा ४६ अशांवर पोहोचला. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अमरावती आणि वर्धा येथे झाली. येथे ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तर नागपूर ४३.८, अकोला ४५.४, ब्रम्हपुरी ४५.२, चंद्रपूर ४३.६, वाशीम ४३.२ तर यवतमाळ येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, पुढील चार दिवस अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तर चंद्रपूर येथे सोमवारपासून पुढील दोन दिवस उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना पुढील काही दिवस तीव्र उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसात १ ते ३ अंशांनी हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची स्थिती आहे. मागील काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती होती. सध्या या प्रदेशात बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे असून काही ठिकणी पावसाची नोंद होत आहे. तर मराठवाड्याही सरासरी कमाल तापमानाहूमी १ ते २ अंश अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. शनिवारी परभणी येथे ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.दरम्यान, रविवारी कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, आदी भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या दरम्यान तशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील असाही हवामान विभागाचा अंदाज असून या भागांना रविवारी हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.


Tuesday, May 12, 2026

देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; साडेचार लाख हेक्टर जमीन वहिवाटदारांच्या नावे होणार

 ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ पावसाळी अधिवेशनात; ५ जूनपर्यंत हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू

राज्यातील धार्मिक आणि धर्मादाय संस्थांकडे असलेल्या देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यभरातील सुमारे साडेचार लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी त्या जमिनी कसणाऱ्या पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांच्या नावे करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ आणण्याच्या तयारीत असून, तो आगामी पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे.
राजे-महाराजांच्या काळात मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक कार्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी इनाम म्हणून देण्यात आल्या होत्या. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देवदेवता, मठ आणि मंदिरांच्या नावावर लाखो एकर जमीन आहे. अनेक वर्षांपासून या जमिनी शेतकरी किंवा कुळांकडून कसल्या जात असल्या तरी त्यांची मालकी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर नव्हती. तसेच या जमिनींचे हस्तांतरणही शक्य नव्हते.
देवस्थान जमिनींच्या मालकीसंदर्भातील दीर्घकालीन वाद मिटवण्यासाठी महसूल विभागाने नवीन धोरण तयार केले आहे. या कायद्याच्या प्रारूपावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून, ५ जूनपर्यंत त्या नोंदविता येणार आहेत.
प्रस्तावित कायद्यानुसार धार्मिक किंवा धर्मादाय संस्थांकडे असलेली इनामे खालसा करण्यात येतील. त्यानंतर संबंधित जमिनी पुजारी, वहिवाटदार किंवा मिरासदार यांच्या कायमस्वरूपी मालकीच्या केल्या जाणार आहेत. मात्र यासाठी संबंधितांकडून रेडीरेकनर दरानुसार मूल्य आकारले जाणार असून, ही रक्कम संबंधित देवस्थान संस्थेला देण्यात येणार आहे.
तसेच या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये समाविष्ट केल्या जातील. मात्र, एखाद्या वहिवाटदाराकडे कमाल जमीन धारण कायद्यानुसार निश्चित मर्यादेपेक्षा अधिक जमीन असल्यास अतिरिक्त जमीन सरकारजमा करण्यात येणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी देवस्थान जमिनींवर बेकायदेशीर कब्जा आणि हस्तांतरणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार अशा जमिनी ताब्यातून काढून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, १ जानेवारी २०११ पूर्वी झालेल्या अतिक्रमणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर दंड आकारून ते नियमित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
याशिवाय, कोणी चुकीच्या पद्धतीने देवस्थानची जमीन बळकावल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीस दोन ते पाच वर्षे कारावास आणि बाजारभावाएवढा दंड अशी कठोर तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
दरम्यान, हैदराबाद इनामे व रोख अनुदाने नाहिसे करण्याचा अधिनियम, हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम आणि वक्फ अधिनियम यांच्या कक्षेत येणाऱ्या जमिनींना या नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...