26_01_29

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांत बदल; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला निकाल

 जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांत बदल; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला निकाल

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशन मागे घेणे, चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उर्वरित निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता समाप्त होईल. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.



26_01_28

जन आरोग्य, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा:- अनिल बोर्डे

 जन आरोग्य, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा:- अनिल बोर्ड

गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जोतीराव फुले एकत्रितपणे राबविण्यात येत असून या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांच्या मर्यादित उपचार मिळणार आहेत. राज्यातील सर्व नागरिकांनी आयुष्यमान कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केले आहे. 

         पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना ,पांढरे रेशन कार्डधारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी- कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. लाभार्थ्याचे आयुष्यमान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी, आपले सेवा केंद्रातील कर्मचारी यांच्यामार्फत तयार केले जात आहे. 

          लाभार्थी आयुष्यमान ॲप किंवा https:/beneficiary.nha.gov in/ या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्याय द्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्ड तयार निर्मितीसाठी अद्यायावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारची जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, असे अनिल बोर्डे नमूद केले आहे.




26_01_21

बीड सिव्हिल हॉस्पिटल: लिफ्टचे काम रखडले, रुग्णांना त्रास

 बीड सिव्हिल हॉस्पिटलची लिफ्ट अद्याप बंद; रुग्णांना जिन्याने हालचाल करावी लागत असल्याची स्थिती

 बीड प्रतिनिधि: राजू ईनामदार
बीड येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमधील लिफ्ट सेवा अनेक दिवसांपासून बंद असून आजच्या तारखेपर्यंत ती सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्ण, वृद्ध नागरिक, दिव्यांग तसेच व्हीलचेअरवरील रुग्णांना जिन्याने वर-खाली हालचाल करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
या लिफ्टबाबतची समस्या यापूर्वी बातमीच्या माध्यमातून समोर आली होती. तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे CO साहेब यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात लिफ्ट सेवा सुरू झालेली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या नव्या व्हिडिओ व छायाचित्रांमध्ये रुग्णांना व्हीलचेअरच्या सहाय्याने जिन्याने हलवावे लागत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. बहुमजली इमारतीत उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसाठी लिफ्ट ही अत्यावश्यक सुविधा असताना ती बंद असणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. विशेषतः गंभीर आजारी, शस्त्रक्रियेनंतरचे रुग्ण, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जिन्याने हलवणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
लिफ्ट दुरुस्तीचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि सेवा कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांकडून लवकरात लवकर उपाययोजना करून लिफ्ट सेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपादक :- शेख शाजेब (समीर)


इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...