Wednesday, February 25, 2026

असहकार व बेमुदत लिपिक संप: बीड जिल्ह्यात कामबंद आंदोलनाची हाक

 

बीड (प्रतिनिधी):
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा बीड यांच्या वतीने असहकार व बेमुदत लिपिक संपाचे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या बॅनरवर नमूद केल्यानुसार, लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राबविण्यात येत असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
दरम्यान, या कामबंद आंदोलनामुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणीही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.



विस्तारित कार्यकारिणी सभेत संघटन बळकटीवर भर- डॉ.कैलास भाऊ कदम महाराष्ट्र इंटक प्रदेशाध्यक्ष

 

मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य यांची विस्तारीत कार्यकारिणी सभा रविवारी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मामा फाळके सभागृह, मजदूर मंजिल, परेल, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. यावेळी सरचिटणीस मा. गोविंद मोहिते, चिटणीस मुकेश तिगोटे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनीही सभेला उपस्थित राहून जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

या बैठकीत राज्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या, नव्या कामगार कायद्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. कैलास कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कामगार हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट आणि संघटन बळकटीची गरज अधोरेखित केली. तर सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी राज्यभर संघटन विस्तार व सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले.

सभेचा समारोप संघटन एकजुटीच्या निर्धाराने करण्यात आला. महाराष्ट्रातील कामगारांच्या हक्कांसाठी इंटक अधिक तीव्र आणि संघटितपणे लढा उभारेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





पाटोदा हद्दीत घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेची बेडी

 
बीड हलचल प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावून तिघा आरोपींना अटक केली आहे. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलीस ठाणे पाटोदा गु.र.नं. 45/2026 कलम 331(2), 305 भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ज्योतीराम शरद भोसले (वय 25), राहुल काशीनाथ पवार (वय 20) व बबनेश उर्फ बाबुशा भोसले (वय 20, सर्व रा. जामखेड, जि. अहमदनगर) यांनी मिळून सदर घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत व मा. अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री. शिवाजी बेंडेवाड यांच्या नेतृत्वात पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यामध्ये –

पोउपनिरीक्षक खटावकर,

पोहे/सोमनाथ गायवाड,

पोहे/बाबू सानप,

पोहे/राहुल शिंदे,

पोअं/अर्जुन यादव,

पोअं/मनोज परशुराम,

पोअं/अशफाक सय्यद,

चापो/वडमारे व मांजरे यांचा समावेश होता.

पुढील तपास पोलीस ठाणे पाटोदा करीत आहेत. 



Tuesday, February 24, 2026

माजलगांव शहर पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची उस्मानिया फाउंडेशनला सदिच्छा भेट


 
माजलगांव (प्रतिनिधी): माजलगांव शहर पोलिस स्टेशनचे दबंग व कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक (पी.आय.) राहुल सूर्यतळ यांनी उस्मानिया फाउंडेशनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.
बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यात कार्यरत असलेली उस्मानिया फाउंडेशन ही सामाजिक संस्था गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात देत आहे. विशेषतः रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुग्णांना संस्थेमार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच गरीब कुटुंबांना आवश्यक ती मदत वेळोवेळी पुरवली जाते.
या भेटीदरम्यान पी.आय. राहुल सूर्यतळ यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. समाजातील गरजूंना मदत करणाऱ्या संस्थांना प्रशासनाचे सहकार्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उस्मानिया फाउंडेशनच्या वतीनेही पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात आले. समाजहिताच्या कार्यात पोलिस व सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास अधिक परिणामकारक मदत करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
माजलगांवमध्ये सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या उस्मानिया फाउंडेशनच्या या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 



Sunday, February 22, 2026

बीडमध्ये बसस्थानकासमोरील रस्त्यावर इलेक्ट्रिक बसमध्ये बिघाड; धुरामुळे प्रवाशांमध्ये घबराट – वाहतूक पोलिसांची तत्परता

 सोलापूर–औरंगाबाद मार्गावरील बसमध्ये अचानक धूर; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून वाहतूक काही काळ रोखली

बीड (प्रतिनिधी) – बीड बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर आज सकाळी सोलापूरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बसमधून धूर निघू लागला. ही घटना रस्त्यावर घडल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला व प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच तेथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही काळ वाहतूक थांबवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

या वेळी वाहतूक पोलीस हवालदार आदिनाथ मुंडे, पोलीस हवालदार राजाभाऊ तांदळे, संतोष हरके, पोलीस शिपाई राहुल घाडगे व पोलीस शिपाई राजू काळे यांनी तत्परता दाखवत मोठी दुर्घटना टाळली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित विभागाकडून बसमधील तांत्रिक बिघाडाची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती लवकरच सुरळीत झाली




Tuesday, February 17, 2026

मुलीची छेड काढणाऱ्यास जाब विचारल्याने चाकूने वार.

 बीड शहरातील बलभीम कॉलेज परिसरातील घटनेने खळबळ

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील माळे गल्लीत राहणारे शाम पुरुषोत्तम जमदाडे वय 49 वर्ष यांच्यावर चाकूने हल्ला करून तिघांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 17 फेब्रुवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बलभीम कॉलेज ते मिल्या कॉलेज या गल्लीदरम्यान घडली.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार,जमदाडे यांच्या मुलीला परिसरातील एका तरुणाकडून वारंवार फोन करून त्रास दिला जात होता. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी संबंधित तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र ते प्रकरण समेटाने मिटविण्यात आल्याचे सांगितले जाते. तरीदेखील संबंधित तरुणाने पुन्हा मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले होते.
या पार्श्वभूमीवर शाम पुरुषोत्तम जमदाडे यांनी त्या तरुणाला जाब विचारला असता,त्याने जमदाडे यांच्यावर चाकूने वार करून मारहाण केली. या हल्ल्यात जमदाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, बीड शहरात वाढत्या हाणामारी, खून व गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाल्यानेच अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गुंडांची बीड शहरात धिंड काढावी. तसेच अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.





Monday, February 16, 2026

माजलगावात किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 
माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर चव्हाण हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. मोपेडला कट मारल्याचा जाब विचारल्यामुळे पाच जणांच्या टोळक्याने शुभम रूपचंद कांबळे या तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी पाचही संशयितांना जातीय शिवीगाळ आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कांबळे हा मुख्य रस्त्यावरून आपल्या दुचाकीवरून जात असताना, रवी कुऱ्हाडे याने त्याच्या गाडीला कट मारला. शुभमने 'गाडीला कट का मारला?' असा जाब विचारला असता, रवीने त्याला जातीयवाचक शिवीगाळ करत मागून धडक दिली. त्यानंतर रवी कुऱ्हाडे आणि लक्ष्मण शिंदे यांनी इतर काही साथीदारांना बोलावून शुभमवर हल्ला चढवला.
पालकांनाही जीवे मारण्याची धमकी
जीव वाचवण्यासाठी शुभम पळत असताना विशाल, विलास आणि राहुल चव्हाण यांनी त्याला पकडले. यावेळी रवी कुऱ्हाडे याने शुभमचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर लक्ष्मण शिंदे याने त्याच्या छातीवर आणि गुप्तांगावर लाथा मारल्या. मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेले वडील रूपचंद कांबळे यांनाही आरोपींनी जातीय शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.


पोलिसांची तात्काळ कारवाई
शुभम आणि त्याचे वडील रूपचंद कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रवी कुऱ्हाडे, विशाल चव्हाण, विलास चव्हाण, राहुल चव्हाण आणि लक्ष्मण शिंदे (सर्व रा. वडरवाडा) यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







Wednesday, February 11, 2026

बीड पोलीस भरतीदरम्यान दुर्दैवी घटना; धावण्याच्या चाचणीत तरुणाचा मृत्यू!

 मृत तरुण परळी तालुक्यातील असल्याची माहिती

बीड (प्रतिनिधी) — बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आज मैदानी चाचणीवेळी एक दुर्दैवी घटना घडली. धावण्याच्या फेरीत सहभागी झालेला एक उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळला. उपस्थित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले.

मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित उमेदवाराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेमुळे भरती केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

मृत उमेदवार दीपक भास्कर वावळ (रा. परळी तालुका) असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .



राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे सरसावले सोनू सूद आणि तेज प्रताप यादव

 चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आत्मसमर्पण; आर्थिक अडचणींवर मदतीचा हात

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स प्रकरणात गेल्या आठवड्यात गुरुवारी दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यांच्या आर्थिक अडचणींबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
मंगळवारी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी त्यांच्या आगामी चित्रपट प्रकल्पासाठी राजपाल यादव यांना साइनिंग अमाऊंट देणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र व जनशक्ती जनता दलचे नेते तेज प्रताप यादव यांनीही राजपाल यादव यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत दिली होती. मात्र, ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी तिहार तुरुंगात हजेरी लावली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणे म्हणजे कायद्याप्रती अनादर दाखवणे होय. केवळ अभिनेता किंवा चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याच्या आधारावर कोणतीही विशेष सवलत दिली जाऊ शकत नाही.”
माध्यमांतील वृत्तानुसार, तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादव भावुक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी राजपाल यादव यांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे.




Tuesday, February 10, 2026

कार-ट्रॅक्टर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

 

माजरसुंबा घाटाच्या पायथ्याशी, पाली मांजरी फाट्याजवळ अवघ्या एक किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. कारने कारखान्यातून येणाऱ्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
धडकेनंतर कारच्या पुढील बाजूस बसलेला एक प्रवासी रस्त्यावर खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.



Sunday, February 8, 2026

अंकुर फाट्याजवळ अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यावर चाकूचा धाक; ४.१० लाखांचा ऐवज लंपास

 



अंबाजोगाई | प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवास करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय अंबाजोगाई येथील एका व्यापाऱ्याला आला आहे. लघुशंकेसाठी कार थांबवताच दबा धरून बसलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना अंकुर फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंबाजोगाई येथील व्यापारी श्रीराम सतीश ढगे (वय ३२) हे गुरुवारी रात्री आपल्या कारने लोखंडी सावरगाव मार्गे धानोरा खुर्दकडे जात होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अंकुर फाट्याजवळ त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली. कारमधून उतरताच २५ ते ३० वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना वेढले.

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, बोटातील २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, लॅपटॉप आणि १५ हजार रुपयांची रोकड असा मौल्यवान ऐवज जबरदस्तीने काढून घेतला व घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



Friday, February 6, 2026

बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई; अवैध गुटखा व दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल



 
बीड (प्रतिनिधी) : बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गुटखा व दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.


उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या आदेशानुसार पोलीस पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी साडेनऊच्या सुमारास महालक्ष्मी चौक, धुळे–सोलापूर रोड, ता. जि. बीड येथे पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक MH-23-AS-5522) संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता चालक लक्ष्मण राधाकिसन खांडे (रा. म्हसजवळा, ता. जि. बीड) याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला साठवलेला आढळून आला.


कारवाईदरम्यान हिरा पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला, रॉयल २२० तंबाखूचे पुडे, V-1 तंबाखूच्या गोळ्या तसेच स्कॉर्पिओ गाडी असा एकूण १३ लाख ७४ हजार १४० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक ४५/२०२६ अन्वये भा.न्या.सं. २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४




प्रभाग २३ मध्ये तुंबलेली नाली तत्काळ साफ; नागरिकांना दिलासा

 पापा भाई मोमीन यांच्या घरासमोरील नालीमुळे रस्त्यावर साचले होते पाणी

प्रभाग क्रमांक २३ मध्ये पापा भाई मोमीन यांच्या घरासमोरील नाली तुंबल्यामुळे नालीचे सांडपाणी थेट रस्त्यावर साचत होते. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये–जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याच परिसरात आज एका कुटुंबातील व्यक्तीचे दुःखद निधन झाल्याने अंत्यविधी व इतर कामांसाठी रस्त्याची तत्काळ साफसफाई करणे अत्यावश्यक बनले होते.
या बाबत माहिती मिळताच नगरसेवक वाजेद जावेद कुरेशी यांनी तात्काळ दखल घेत जेसीबी, टेंपो व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. तुंबलेली नाली साफ करून साचलेले पाणी काढण्यात आले, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.
या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार समीर सरकार, मोमीन पापा भाई, नाजिम भाई रक्से तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सुहान शेखला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव

 School of Scholars, माजलगावमध्ये सातत्य, शिस्त आणि गुणवत्तेची दखल


माजलगाव | प्रतिनिधी :
School of Scholars, माजलगाव येथे शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुहान शेख याला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे संचालक ओमकार खुरपे यांच्या शुभहस्ते सुहानला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
सुहान शेख याने वर्षभर अभ्यासात सातत्य राखत शिस्त, प्रावीण्य आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. केवळ अभ्यासातच नव्हे, तर वर्तन, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव या सर्व बाबींमध्ये तो आदर्श ठरल्यानेच त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.
सुहानच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग तसेच पालकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. “यश एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात,” हे सुहानने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
हा गौरव सुहानच्या कुटुंबासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे. सुहान हा राजु मोगरेकर यांचा मुलगा असून समीर मोगरेकर यांचा पुतणे आहे. कुटुंबातील संस्कार, योग्य मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पुरस्कारामुळे सुहानच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यात तो आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे. सुहानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Tuesday, February 3, 2026

बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

 महाराष्ट्र शासनाचा अधिकृत आदेश जारी; पुणे व बीड जिल्ह्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे

बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज जाहीर केला.
यापूर्वी पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार कार्यरत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्णय घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल तसेच विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाचा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीसह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.




खून करून फरार झालेला आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 गुन्ह्यानंतर राज्याबाहेर पसार झालेल्या आरोपीला बीड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पकडले



बीड, दि. ३ (प्रतिनिधी) – खून करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात बीड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद केले.

सदर घटना बीड जिल्ह्यातील एका गावाच्या हद्दीत घडली होती. आपसी वादातून आरोपीने तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर आरोपी राज्याबाहेर पळून गेल्याचे निष्पन्न झाले होते.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू ठेवला. अखेर दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे.



Monday, February 2, 2026

रायमोहा येथील एम के उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक सय्यद समयोदिन यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड च्या वतीने प्रति वर्ष दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक एक फेब्रुवारी रोजी हॉटेल गोल्डन चॉईस येथे पार पडला. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून या वेळी रायमोहा येथील एम के उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक सय्यद समयोदिन बद्रोदिन यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला यावेळी शहरातील नागरिक , शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी व शिक्षण प्रेमी उपस्थित होते


धक्कादायक : ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बीडच्या खोकरमोहा गावातील घटना

 बीडजवळ खळबळ! खोकरमोहा येथे ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून, कारण अद्याप अस्पष्ट

बीड जिल्ह्यातील खोकरमोहा गावात एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात कोणत्या कारणातून आणि कोणी हत्या केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मृत तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांची चौकशी तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या गंभीर घटनेचा उलगडा करत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





अक्षरधाम हल्ला : निर्दोष सुटले, पण खरे गुन्हेगार आजही मोकाट!

 सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता केली, पोलिस तपासातील गंभीर त्रुटींवर ताशेरे; तरीही दोन दशकांनंतरही ‘खरे सूत्रधार कोण?’ हा प्रश्न अनुत्तरित

२००२ साली गुजरातमधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या भीषण हल्ल्यानंतर बराच काळ कोणताही ठोस धागा हाती न लागल्यानंतर, काही महिन्यांनी पोलिसांनी एकाच दिवशी सर्व आरोपींना अटक केल्याचा दावा केला. मात्र, या अटकेपासूनच तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
पोलिसांनी सादर केलेल्या कथित कबुली जबाबांच्या आधारे खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली, त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने काही आरोपींना जन्मठेप तर काहींना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र, १६ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा संपूर्ण निकाल रद्द करत सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने आपल्या निकालात गुजरात पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटींवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींकडून घेतलेले कबुली जबाब स्वेच्छेने दिलेले नसून दबावाखाली आणि बेकायदेशीर मार्गाने घेतले गेले होते. निष्पाप लोकांना गोवण्यासाठी बनावट पुरावे तयार करण्यात आले, स्वतंत्र व निष्पक्ष साक्षीदारांचा पूर्णतः अभाव होता आणि तपास प्रक्रियेत कायद्याचे मूलभूत निकष पाळले गेले नव्हते, असेही न्यायालयाने नमूद केले.
योगायोग असा की, ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नरेंद्र मोदींनी प्रचंड बहुमतासह पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी हा ऐतिहासिक निकाल देण्यात आला. परिणामी, हा निकाल आणि त्यातून निर्माण झालेले गंभीर प्रश्न हळूहळू सार्वजनिक स्मृतीतून पुसले गेले.
या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
१) अब्दुल रशीद सुलेमान अजमेरी
२) मुहम्मद फारूक मुहम्मद हनीफ शेख
३) मुहम्मद यासीन उर्फ यासीन भट्ट
यांचा समावेश आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, हल्ल्याच्या वेळी हे तिघेही भारताबाहेर होते. तरीही कोणताही नवा किंवा ठोस पुरावा नसताना त्यांना २०१९ मध्ये अटक करण्यात आली. अखेर अहमदाबादच्या विशेष पोटा (POTA) न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
निर्दोष असूनही या आरोपींना तब्बल सहा वर्षे तुरुंगात काढावी लागली. कुटुंबापासून दूर राहावे लागले, समाजात ‘दहशतवादी’ म्हणून शिक्का बसला आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक छळाला सामोरे जावे लागले. हा सारा अन्याय पोलिसांच्या ढिसाळ तपासाचा आणि बेजबाबदार कारवाईचा परिणाम असल्याचे न्यायालयीन निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
२०१४ च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला तपास प्रक्रियेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली होती. मात्र, त्यानंतरही खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, ही बाब देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर मानली जात आहे.
मुफ्ती अब्दुल कय्यूम यांनी त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवांवर आधारित लिहिलेली ‘ग्यारह साल सलाखों के पीछे’ ही जेल डायरी तपास यंत्रणांच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकते. धर्माच्या आधारावर निष्पाप तरुणांना दहशतवादी ठरवून त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले गेले, याचे विदारक चित्र या पुस्तकातून समोर येते.
दोन दशकांनंतरही अक्षरधाम मंदिर हल्ल्याचे खरे सूत्रधार कोण, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. न्यायालयांनी निर्दोषांना मुक्त केले, पण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या. अशा परिस्थितीत, दहशतवादाच्या बळींना आणि समाजाला खरे न्याय कधी मिळणार, हा प्रश्न कायम राहतो.



ढाकेफळ शिवारात भीषण अपघात; शिंदेसेनेच्या तालुका उपप्रमुखांचा दुर्दैवी अंत

 रेणुकादेवी यात्रेहून परतताना राष्ट्रीय महामार्गावर कारने दुचाकीला दिली धडक; उपचारापूर्वीच मृत्यू

केज (प्रतिनिधी):
अहमदनगर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर ढाकेफळ शिवारातील कारभारी हॉटेलसमोर झालेल्या भीषण कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे केज तालुक्याचे उपप्रमुख चंद्रकांत शहाजी इंगळे (वय ५०, रा. सादोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
चंद्रकांत इंगळे हे केज तालुक्यातील पिसेगाव येथे भरवण्यात आलेल्या दोन दिवसांच्या रेणुकादेवी यात्रेच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते दुचाकी क्रमांक एमएच ४४ / एसी ६९३१ वरून सादोळा येथे परतत असताना अंबाजोगाईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच १६ / डीसी ८८४७ ने ढाकेफळ शिवारात कारभारी हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. निवृत्ती मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भावजई व दोन पुतणे असा परिवार आहे.
दहा वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात त्यांचे बंधू शिवशंकर शहाजी इंगळे यांचा मृत्यू झाला होता. पुन्हा त्याच प्रकारच्या अपघातात चंद्रकांत इंगळे यांचा मृत्यू झाल्याने सादोळा व केज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Sunday, February 1, 2026

पाटोदा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक शेख कलीमुद्दीन गुलाम दस्तगीर यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’


महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शेख कलीमुद्दीन गुलाम दस्तगीर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

शेख कलीमुद्दीन गुलाम दस्तगीर हे गेल्या अनेक वर्षांपासून पाटोदा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत असून, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. अध्यापनातील नावीन्यपूर्ण पद्धती, विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे.
शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, मागास व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने त्यांच्या सेवाभावाची आणि योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला. या सन्मानामुळे पाटोदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकारी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


तक्रारींची दखल न घेतल्याने जल बोर्डातील अधिकारी निलंबित; मंत्री परवेश वर्मा यांची अचानक कारवाई

 राजेंद्र नगर, कन्हैया नगर व अशोक विहार झोनमध्ये अचानक तपासणी; तक्रारींची दिरंगाई आणि कामकाजातील हलगर्जीपणामुळे कारवाई

दिल्ली: दिल्लीतील नागरिकांच्या पाणीपुरवठा व बिलिंगसंदर्भातील तक्रारी वेळेत न सोडवल्याप्रकरणी दिल्लीचे जलमंत्री परवेश साहिब सिंग वर्मा यांनी कडक पावले उचलत तीन झोनल रेव्हेन्यू अधिकारी आणि एका सहाय्यक विभागीय अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ही कारवाई राजेंद्र नगर, कन्हैया नगर व अशोक विहार येथील दिल्ली जल बोर्डच्या झोनमध्ये करण्यात आली आहे.
जलमंत्री वर्मा यांनी संबंधित झोनमध्ये अचानक तपासणी करून उपस्थिती रजिस्टर, तक्रार नोंदी व दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. तपासणीत अनेक अधिकारी कामावर अनुपस्थित असल्याचे, तसेच तक्रारींची योग्य नोंद व पाठपुरावा होत नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, जनतेच्या कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी तात्काळ पर्यायी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मंत्री परवेश वर्मा यांनी सांगितले की, दिल्लीतील अनेक नागरी समस्या मागील सरकारच्या काळात प्रलंबित राहिल्या असून सध्याचे सरकार जबाबदारी निश्चित करून प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यावर भर देत आहे. ही कारवाई त्याच दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बीडमध्ये पुन्हा दहशत! हॉटेलमध्ये तरुणावर लोखंडी रॉड-चाकूने अमानुष हल्ला

 चार जणांचा राडा; मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद, व्हिडीओ व्हायरल

बीड (प्रतिनिधी) :
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये चार जणांनी ३२ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या हल्ल्यात नितीन लोंढे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीची माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
या प्रकरणी रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख व साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


सिरसाळ्यात धक्कादायक घटना: २०० रुपयांच्या वादात ४० वर्षीय मजुराचा मृत्यू

 अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून ठरलेल्या दंडाच्या वाटणीवरून उफाळलेला वाद मजुराच्या मृत्यूचे कारण ठरला

जातपंचायतीने ठरवलेल्या दंडाच्या रकमेच्या वाटणीवरून निर्माण झालेल्या क्षुल्लक वादातून एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या हिशेबावरून वाद झाला. हा वाद अचानक विकोपाला गेला. धक्काबुक्कीत संजू उबदे यांना पाठीवर जोरदार धक्का दिल्याने त्यांचा तोल जाऊन ते तोंडावर जमिनीवर कोसळले. या पडझडीत त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संजू उबदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 जातपंचायतीचा दंड ठरला वादाचे मूळ

या घटनेमागे जातपंचायतीची पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळा येथे जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधित व्यक्तींवर सुमारे ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली. मात्र, या वाटणीतील व पूर्वी दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे व पस्तमवाड यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांनी सायलू पस्तमवाड याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



माजलगाव पालिकेत राष्ट्रवादीत उभी फूट; ‘जगताप–चाऊस’ संघर्षाने राजकारण तापले

 स्वतंत्र गट नोंदणीने सत्ताधारी पक्षात खळबळ, नगरसेवक दोन गटांत विभागले

माजलगाव | प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघा महिना होत नाही, तोच माजलगाव नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात गंभीर फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. मोहन जगताप आणि सहाल चाऊस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षाचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले आहेत. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण दहा नगरसेवक निवडून आले आहेत. प्रारंभी इम्रान आगा खान यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडीतून मतभेदांना तोंड फुटले. मोहन जगताप समर्थित उमेदवाराला विरोध करत सहाल चाऊस यांनी थेट वेगळी भूमिका घेतली. त्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाशी जवळीक साधत उपाध्यक्षपद मिळवले. यानंतर दोन्ही गटांतील तणाव अधिकच वाढत गेला.

विषय समिती निवडीत अडथळा

दोन दिवसांपूर्वी विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडणार होती. मात्र गटनेत्यासह जगताप गटातील चार नगरसेवकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने निवड पुढे ढकलावी लागली. गटनेता आपल्या बाजूने नसल्यास प्रशासनात अडचणी निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन सहाल चाऊस यांनी हालचालींना वेग दिला.






नवीन गटाची नोंदणी

सहाल चाऊस यांनी अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत नऊ सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी लतिफ सय्यद हुर यांची निवड करण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या गटाला अधिकृत मान्यता मिळते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विकासावर प्रश्नचिन्ह

पालिकेतील सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवकांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात उघड संघर्ष सुरू झाल्यास, नगरपालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अंतर्गत राजकारणामुळे माजलगावच्या विकासाला फटका बसला होता. आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...