26_08_12

इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

 बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी 

बीड शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सलीम पेट्रोलपंप, इमामपूर रोड, बीड येथे ही घटना घडली. फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांच्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठबीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बीएनएसच्या कलम 109, 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 300/2026 असून, पुढील तपास सपोनि दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इमामपूर रोडवरील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गेल्या काही दिवसांत बीड परिसरात गोळीबाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






26_08_09

३ हजारांची लाच घेताना ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

 मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी मागितली लाच; बनेश्वर मंदिराजवळ रंगेहात कारवाई, बीड जिल्ह्यात पुन्हा लाचखोरीचा प्रकार उघड

बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असताना, एसीबीने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत ग्रामरोजगार सेवकाला रंगेहात पकडले. पीएम घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवण्यात आले.

एसीबीच्या माहितीनुसार, गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) हे ग्रामपंचायत बनसारोळा येथे ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पीएम घरकुल योजनेतील ३० मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी प्रति मस्टर १०० रुपये, अशा एकूण ३ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार बनेश्वर मंदिराजवळ गोरे यांनी लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचंगुंडे, अविनाश गवळी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





26_07_31

४५ लाखांची लाच घेताना विभागीय वन अधिकारी रंगेहात अटक; बीडमध्ये खळबळ

 सामाजिक वनीकरण विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; एसीबीचा सापळा यशस्वी, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातच धाडसी पाऊल

बीड |हलचल  
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत असतानाच अवघ्या काही वेळात सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या धाडसी कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीनंतर लखमावाड काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून नगर नाका परिसरातील त्यांच्या राहत्या घरी गेले. दरम्यान, एसीबीचे पथक त्यांच्या हालचालींवर सुमारे दोन तास लक्ष ठेवून होते आणि योग्य संधीची प्रतीक्षा करत होते.
तक्रारदार हे वन परिक्षेत्र अधिकारी असून त्यांच्या विविध प्रशासकीय कामांसाठी लखमावाड यांनी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २९ जुलै रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. वृक्ष लागवड निधी वितरित करण्यासाठी १२ टक्के कमिशन, निलंबनाचा प्रस्ताव पुढे न पाठवणे, प्रलंबित वेतनवाढ मंजूर करणे तसेच नर्सरी कामाच्या चौकशीत सहकार्य करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदार ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले. लखमावाड यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन बीड येथील एसीबी कार्यालयात आणण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले तसेच त्यांच्या पथकाने केली. कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी बीड येथील कार्यालयाला भेट देऊन पथकाचे अभिनंदन केले. विभागातील आतापर्यंतची ही सर्वात मोठ्या लाच रकमेवरील कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


26_07_24

बीड शहरात अवैध विदेशी दारू जप्त; 1.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 DB पथकाची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल, कारंजा रोड परिसरात धडक ऑपरेशन

बीड शहरात अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई करत DB पथकाने कारंजा रोड परिसरातून अंदाजे 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 40 हजार रुपयांची विदेशी दारू तसेच सुमारे 1 लाख रुपयांची एक मोसा जप्त करण्यात आली असून, चोरट्या विक्रीसाठी हा माल नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक शेख समीर, SDPO व्यंकटराम तसेच बीड शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत पोह. शहेंशा सय्यद, गहिनीनाथ बावणकर, राजेंद्र मुंडे, पोअं. शेख इलियास, राम पवार आणि मंगेश शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

26_06_28

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

 पाली या गावचे सुपुत्र डॉ. सचिन सूर्यभान वीर यांनी इंग्लंडमधील प्रतिष्ठित FRCS (Urology) परीक्षा मे २०२६ मध्ये उत्तीर्ण केली

बीड हलचल, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पाली या गावचे सुपुत्र डॉ. सचिन सूर्यभान वीर यांनी इंग्लंड (UK) येथील मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी FRCS (Urology) ही परीक्षा मे २०२६ मध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाली गाव, बीड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ. सचिन सूर्यभान वीर हे सूर्यभान वीर व निवृत्त मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांचे सुपुत्र आहेत. कुटुंबातील शैक्षणिक परंपरा, संस्कार आणि अभ्यासू वातावरणामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा निर्माण झाली. याच बळावर त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. वीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल, चौसाळा येथे दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी बारावीचे शिक्षण राजर्षी शाहू कॉलेज, लातूर येथे पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी के. एम. हॉस्पिटल, मुंबई येथून MBBS पूर्ण केले. पुढे सर सयाजीराव गायकवाड हॉस्पिटल, बडोदा (गुजरात) येथून MS (General Surgery) ही पदव्युत्तर पदवी संपादन करून शस्त्रक्रिया क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले. उच्च शिक्षणानंतर डॉ. वीर यांनी मुंबईतील के. एम. हॉस्पिटल, मुंबई तसेच ग्लोबल हॉस्पिटल , मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत युरोलॉजी क्षेत्रात 2020 पर्यंत प्रॅक्टिस केली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये युरोलॉजी या विशेष शाखेत कार्य करत आपले ज्ञान, अनुभव आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत केले. दरम्यान, त्यांनी इंग्लंडमधील FRCS (Urology) ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा दिली. ही परीक्षा दोन टप्प्यांत आयोजित केली जाते आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी सखोल वैद्यकीय ज्ञान, शस्त्रक्रिया कौशल्य, क्लिनिकल निर्णयक्षमता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनत आवश्यक असते. अशा कठीण परीक्षेत मे २०२६ मध्ये यश मिळवून डॉ. सचिन वीर यांनी आपल्या परिश्रम, जिद्द आणि समर्पणाचा ठसा उमटवला आहे. डॉ. वीर यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी किंवा पाली गावासाठीच नव्हे, तर बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास जागतिक स्तरावरही यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण डॉ. सचिन वीर यांनी घालून दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय आणि शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




26_06_11

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

 प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण

शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासनाने अनोखी पद्धत अवलंबत फुले देऊन संबंधितांना जागा मोकळी करण्याचे आवाहन केले. या सकारात्मक आणि सुसंवादी उपक्रमाला व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत स्वखुशीने अतिक्रमण काढून घेतले.
या कारवाईमुळे बस स्टँड परिसरात मोकळीक निर्माण झाली असून प्रवाशांना ये-जा करण्यास मोठी सोय झाली आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे. पुढील काळातही अशा पद्धतीने अतिक्रमणमुक्त मोहिम राबवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


26_06_06

तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – कामरान खान यांची ठाम मागणी

 परळीतील निर्घृण हत्येने संताप; पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी कायदेशीर मदतीचे आश्वासन

परळी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दि. २ जून रोजी तोहीद खान यांची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख कामरान खान यांनी व्यक्त केली.
घटनेनंतर कामरान खान यांनी परळी येथे भेट देत स्वर्गीय तोहीद खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मृताच्या बंधू फिरोज खान यांच्याशी संवाद साधून कुटुंबाला धीर दिला. तसेच या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी कायदेशीर मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना कामरान खान म्हणाले की, “तोहीद खान यांची ज्या पद्धतीने अमानुष व क्रूर हत्या करण्यात आली, तो अत्यंत जघन्य गुन्हा आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यासच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल.”
स्वर्गीय तोहीद खान यांच्या लहान मुलांची अवस्था आणि कुटुंबावर कोसळलेले दुःख पाहून मन हेलावून गेल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
या प्रसंगी बीड जिल्हा कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शेख सोहेल, काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आहेतेशाम, उस्मानिया फाऊंडेशनचे शेख असेफ (माजलगाव) तसेच परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इमामपूर रोडवर जुन्या वादातून गोळीबार; एक आरोपी अटकेत

  बीड शहरात खळबळ; सहा-सात अनोळखी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी  बीड शहरातील इमामपूर रोड परिसर...