सामाजिक वनीकरण विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; एसीबीचा सापळा यशस्वी, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातच धाडसी पाऊल
बीड |हलचलबीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत असतानाच अवघ्या काही वेळात सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या धाडसी कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीनंतर लखमावाड काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून नगर नाका परिसरातील त्यांच्या राहत्या घरी गेले. दरम्यान, एसीबीचे पथक त्यांच्या हालचालींवर सुमारे दोन तास लक्ष ठेवून होते आणि योग्य संधीची प्रतीक्षा करत होते.
तक्रारदार हे वन परिक्षेत्र अधिकारी असून त्यांच्या विविध प्रशासकीय कामांसाठी लखमावाड यांनी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २९ जुलै रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. वृक्ष लागवड निधी वितरित करण्यासाठी १२ टक्के कमिशन, निलंबनाचा प्रस्ताव पुढे न पाठवणे, प्रलंबित वेतनवाढ मंजूर करणे तसेच नर्सरी कामाच्या चौकशीत सहकार्य करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. तक्रारदार ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले. लखमावाड यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन बीड येथील एसीबी कार्यालयात आणण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले तसेच त्यांच्या पथकाने केली. कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी बीड येथील कार्यालयाला भेट देऊन पथकाचे अभिनंदन केले. विभागातील आतापर्यंतची ही सर्वात मोठ्या लाच रकमेवरील कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment