मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी मागितली लाच; बनेश्वर मंदिराजवळ रंगेहात कारवाई, बीड जिल्ह्यात पुन्हा लाचखोरीचा प्रकार उघड
बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असताना, एसीबीने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत ग्रामरोजगार सेवकाला रंगेहात पकडले. पीएम घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवण्यात आले.
एसीबीच्या माहितीनुसार, गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) हे ग्रामपंचायत बनसारोळा येथे ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पीएम घरकुल योजनेतील ३० मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी प्रति मस्टर १०० रुपये, अशा एकूण ३ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार बनेश्वर मंदिराजवळ गोरे यांनी लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचंगुंडे, अविनाश गवळी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment