स्वतंत्र गट नोंदणीने सत्ताधारी पक्षात खळबळ, नगरसेवक दोन गटांत विभागले
माजलगाव | प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघा महिना होत नाही, तोच माजलगाव नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात गंभीर फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. मोहन जगताप आणि सहाल चाऊस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षाचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले आहेत. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण दहा नगरसेवक निवडून आले आहेत. प्रारंभी इम्रान आगा खान यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडीतून मतभेदांना तोंड फुटले. मोहन जगताप समर्थित उमेदवाराला विरोध करत सहाल चाऊस यांनी थेट वेगळी भूमिका घेतली. त्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाशी जवळीक साधत उपाध्यक्षपद मिळवले. यानंतर दोन्ही गटांतील तणाव अधिकच वाढत गेला.
विषय समिती निवडीत अडथळा
दोन दिवसांपूर्वी विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडणार होती. मात्र गटनेत्यासह जगताप गटातील चार नगरसेवकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने निवड पुढे ढकलावी लागली. गटनेता आपल्या बाजूने नसल्यास प्रशासनात अडचणी निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन सहाल चाऊस यांनी हालचालींना वेग दिला.
नवीन गटाची नोंदणी
सहाल चाऊस यांनी अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत नऊ सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी लतिफ सय्यद हुर यांची निवड करण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या गटाला अधिकृत मान्यता मिळते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विकासावर प्रश्नचिन्ह
पालिकेतील सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवकांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात उघड संघर्ष सुरू झाल्यास, नगरपालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अंतर्गत राजकारणामुळे माजलगावच्या विकासाला फटका बसला होता. आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment