शासन दराला हरताळ फासून २०० रुपयांची जादा वसुली; नागरिक संतप्त, चौकशीची जोरदार मागणी
माजलगाव : शहरातील ‘योगायोग गॅस’ एजन्सीकडून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या अंदाजे ₹९५० रुपयांच्या गॅस टाकीची विक्री तब्बल ₹११५० रुपयांना केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.माजलगाव शहर व परिसरातील अनेक ग्राहकांनी सांगितले की, गॅस टाकी घेताना सर्रास जादा पैसे आकारले जात आहेत. शासन दरापेक्षा जवळपास ₹२०० अधिक रक्कम घेतली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जात असल्याने नाराजी वाढत आहे.
विशेष म्हणजे, दराबाबत विचारणा केल्यास एजन्सीकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याची तक्रार आहे. काही ग्राहकांनी तर पावतीवर कमी रक्कम दाखवून प्रत्यक्षात जास्त पैसे घेतले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारावर संशयाचे सावट गडद झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच गॅस टाक्यांची विक्री व्हावी, अशीही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे माजलगाव शहरात चर्चेला उधाण आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


No comments:
Post a Comment