Tuesday, March 3, 2026

बीड शहरातील मूलभूत समस्या कायम; रमजानमध्ये नागरिक त्रस्त – शेख निसार यांचा इशारा

 

बीड – पवित्र रमजान महिन्यात शहरातील अनेक भागांमध्ये अंधार, पाणीटंचाई आणि अस्वच्छतेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे नेते शेख निसार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे.
गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील मूलभूत समस्यांना कंटाळून बीडकरांनी सत्ता परिवर्तन केले. मात्र, नगरपालिकेत सत्तांतर होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. “जवळचे लाभार्थी कार्यकर्ते जोमात आणि सर्वसामान्य जनता कोमात,” अशी टीका शेख निसार यांनी केली.
शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रमजान महिन्यात पहाटे नमाजासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत खांबांवरील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
याशिवाय, मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम काही दिवसांतच थंडावल्याचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग अद्यापही पडून असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, कचरा कुंड्यांची कमतरता आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
विशेषतः अल्पसंख्याक बहुल वस्त्या वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा भागांना विकासाच्या दृष्टीने प्राधान्य देण्याची मागणी शेख निसार यांनी केली. “संविधानानुसार सत्ताधारी हे जनतेचे सेवक आहेत, स्वतःला मालक समजू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच, विरोधी पक्षानेही जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी करत त्यांनी सांगितले की, “रमजानच्या पवित्र महिन्यात शहरातील सर्व जनहिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
शहरातील वाढत्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. असे पत्रकाद्वारे शेख निसार यांनी कळविले आहे

No comments:

Post a Comment

बस स्टँड समोरील अतिक्रमण फुले देऊन काढून घेतले

  प्रशासनाची अनोखी कारवाई; संवादातून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने हटवले अतिक्रमण शहरातील बस स्टँड परिसरातील वाढते अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रशासन...